साहित्य

कापडण्यातील साहित्यिकांचे साहित्य (कथा, कविता, लेख, इत्यादी) जगभरातील वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. येथे आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी कृपया त्वरित संपर्क साधा.

 • भूपाळी
  कवी - रामदास वाघ, 'कष्टाची भाकर' या काव्यसंग्रहातून (भ्रमणध्वनी: +९१-९४०३४३५२१०)
  अधिक वाचा...

  माझ्या गावची माती
  माती मोतीयांची शेती,
  काय सांगू हिची महती
  जशी मायलेकरांची प्रीती.

  माझ्या गावचा माणूस
  माणूस आभाळाएवढा,
  याच्या वाणीत वाहतो
  प्रेम अमृताचा ओढा.

  माझ्या गावची झाडे
  ॠषिमुनींच्या काळातली,
  ऊन डोईवर झेलूनी
  देतात मायेची सावली.

  माझ्या गावची नदी
  नदी सदा आटलेली,
  हिच्या कणाकणात हो
  मानवता पाझरलेली.

  माझ्या गावची गढी
  गढी भग्न झालेली,
  अहर्निश ही गाते
  इतिहासाची भूपाळी.

 • देवा बोलाहो माझ्याशी
  कवी - योगेश नथ्थु भामरे (भ्रमणध्वनी +९१-९४२३१९४०५६)
  अधिक वाचा...

  देवा बोलाहो माझ्याशी...२
  तारणहार तुम्ही, सखा आमुचे
  का रुसलात माझ्याशी
  देवा...

  जग दाविन्या, जन्म घातला
  जन्मास घालूनी, संसार दाविला
  सुख थोडे, वाटी घालूनी
  दुःखच का हो, जवळी माझ्याशी
  देवा...

  सदोष किती, निर्दोष किती
  निर्दोष राहुनी, सजा भोगीती,
  न्याय देवता, सर्व जानूनी
  अन्याय का हो माझ्याशी
  देवा...

  भले बी आले, बुरे बी आले
  कर्माचे फळ, म्हणे भोगू लागले
  सिध्दांत कर्माचा, आहोत जानूनी
  मन ना माने, गेलो शोकात बुडूनी
  दोष का हो, नशिबाशी
  देवा...

  देह वेगळा, कर्म वेगळे
  विचार वेगळा, मनही वेगळे
  देहातून जेव्हा, होती प्राण वेगळे
  दुःख का हो, दुसऱ्या देहाशी
  देवा...

  मन खचले, अन् गहिवरले
  सुचेना काही, शब्द हरवले
  भिक्षा मागतो, हात पसरुनी
  मार्ग दावाहो, आम्हाशी
  देवा...

 • बाप सांगस बेटाले
  कवी - सुनील वाघ (भ्रमणध्वनी +९१-९४२२७६१८०७)
  प्रस्तुत अहिराणी कवितेत कवी सुनील रामदास वाघ यांनी वडील आणि मुलामधील संवाद अधोरेखीत केला आहे.
  अधिक वाचा...

  बेटा असा जगनू मी
  लिन्हा नही कोना शाप
  तुबी असा जगी जाय
  जसा जगना तुना बाप

  बेटा जाय तू कोठेबी
  तुले वाटा सेत हजार
  उनी गावनी आराई
  मातर व्हयजो हजर

  गरिबनी वसतीमाना
  दूर करजो अंधार
  दिनदुबाड्याले वाटी
  बेटा तुनाज आधार

  मन्ही मान वर राही
  असं करजो रे काम
  बेटा कसटन खायजो
  आनि गायजो रे घाम

  काय सांगू बेटा तुले
  सुखी जीवनना सार
  बठ्ठी दुन्या दखत राही
  असा करजो सवसार

  घाम गायामाज सेना
  बेटा जिंदगीना सार
  जरी उन नही यश
  तरी मानू नको हार

  धनदौलतना मांगे
  पवू नको तू सारखा
  खरी दौलत संतान
  तुले सांगस बरकां

  शेवटना श्वास लोंग
  बेटा ऱ्हायजो रे नेक
  शेवटनी वाटलेबी
  तुले पुजतीन लोक

 • रोड गायस आसू
  कवी - योगेश नथ्थु भामरे (भ्रमणध्वनी +९१-९४२३१९४०५६)
  अधिक वाचा...

  रोड गायस आसू
  कितला भार सोसू
  कितलं रंगत सांडशात
  डाग कसा पुसू

  नेहमी मना आंगवर
  ऱ्हास कितला भार
  लिसन मना आधार
  चालस सौसार

  पुरा जगले
  मी जोडे लयस
  व्हतीस दुर्घटना
  जीव मना बयस

  कितल्या दुर्घटनास्ना
  मी साक्षीदार
  कोनी लेस नही सबक
  धरस रफ्तार

  कितलाक जीव
  मनावर सोडतस जीव
  बेवारस ऱ्हातस पडी
  येस माले किव

  जव्हय जीत्ता जीव
  मनावर तरफडस
  दखीसन त्याना हाल
  थरकाप मना उडस

  घडीभर करता
  चईन नही माले
  सजीव-निर्जीव बठ्ठाच
  चेंदीच ऱ्हातस माले

  माले फिकीर तुमनी
  वेग धरा कमी
  कितलबी चेंदा माले
  सेवा दिसू मी

 • तरुण भारत
  कवी - राहूल छगनलाल बाविस्कर
  अधिक वाचा...

  हे तरुण भारता
  तू पुन्हा ये
  पिकलेल्या नजरांच्या वेशीपर्यंत
  आम्ही तुला शोधतोय
  तुला परत यावचं लागेल

  हे तरुण भारता,
  तुला यावचं लागेल
  असत्याच्या वेशीतून
  सत्य हुडकायला,
  घामाच्या तृणातही चरलेल्या
  कित्येक सुदारामांना शोधायला
  रक्तरंजित लोकशाहीची
  बीजे पुन्हा रोवायला,
  दानवांच्या वस्तीतून
  माणूस जागवायला
  गांधी - नेहरूंच्या स्वप्नातला
  भारत उभारायला

  पण… हे तरुण भारता
  तू झंझावाताप्रमाणे ये
  तुझा शब्द न् शब्द
  तलवारीची धार बनावा
  तुझ्या वाक्यां - वाक्यांत
  जणू दीन दुबळ्या भारतमातेचा
  आक्रोश असावा,
  तुझ्या व्यक्तिमत्त्वात
  जणू खडकावर आदळणाऱ्या
  लाटांचा वेग असावा,
  अन् प्रसंगी
  अंगावर आदळणाऱ्या लाटांचे तुषार
  शांतपणे पाहण्याची स्थितप्रज्ञताही हवी

  हे सुर्यकुलातील तरुण भारता
  तुझा हा झंझावात
  मानवतेसाठीच असावा

 • मावळती
  कवी - योगेश सुरेश पाटील
  अधिक वाचा...

  आज मावळतीला लाली
  का दिसली बरे ?
  उर्वशी ने ओठं तर
  धुतले नाही खरे
  छे ! हो रंभा आणि उर्वश्या
  उरल्या आता कोठे
  गेला होता आमचा राकेश (शर्मा)
  पाहून आला खरे
  आज मावळतीला लाली
  का दिसली बरे ?
  मग मावळतीचा वेळा
  आज रंगला तरी कसा ?
  ओठात होती तिच्या
  भरल्या जवानीची ती नशा
  मग पडला नसेल का रवी
  प्रेमात त्या रजनीच्या
  गोड गुलाबी रंगांची
  असेल ती तर छाया
  खुळा साजना मी तर
  पाहत होतो दुरून
  प्रेमात त्या दोघांच्या
  राहिलो अडथळा बनून
  मग एवढ्यात आला भाऊ
  रजनीच्या क्षितीज धावून
  क्षितिजाच्या अंताने
  केला सूर्याचा खून
  आणि क्षणात नाहीसे झाले
  ते लाल पिवळे ऊन
 • उठूनी पुन्हा चालणार आहे
  कवी - योगेश भगवान पाटील
  अधिक वाचा...

  ठेच लागूनी पडलो आहे
  उठूनी पुन्हा चालणार आहे
  उठवण्याची कोरडी सहानुभूती नको मला
  आशीर्वाद तुमचा हवा आहे

  रक्त निघाले असले तरी
  संवेदना नाही उरी
  नाही चालणार येथे इलाज कुणाचा
  धडा आहे हा माझाच मला

  दगड दिसत असून ठेच लागली
  हृदयातूनी हाक ही आली……
  उठूनी पुन्हा चालणार आहे
 • चारोळी
  शिवराज धनराज माळी
  अधिक वाचा...

  तूला काय पाहीजे ?
  मला फक्त सांग,
  शीर हाती देईन
  'तु' फक्त मांग

  काय करू मी
  मला काही उमजत नाही
  काळ तर काळ
  मला तूही समजत नाही