कापडणे गाव

sthapana-1st-election

शेतीविषयक

  • माती परीक्षण - प्रा. संदिप पाटील
  • दुभती जनावरे - प्रा. संदिप पाटील
  • गांडूळ शेती - प्रा. संदिप पाटील
  • काकडीची लागवड - प्रा. संदिप पाटील
  • बी. टी. कापूस लागवड विशेष बाबी - प्रा. संदिप पाटील
  • माती परीक्षण-

    By - प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)

    माती परीक्षणाची गरज :-
    पीकांच्या वाढीसाठी 13 + 3 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते .त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते . विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे
    माती परीक्षणचा उद्देश :-
    १) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.
    २) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट, हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
    ३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू ,विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद आणि पलाश यासाठी परीक्षण केले जाते .
    ४) जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .
    ५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
    अपेक्सित ऊस उत्पादनाचे सूत्र वापरणेअपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र आपण पाहिले. हे उपयोगात आणणे फार सोपे आहे. यासाठी पहिल्यांदा माती तपासणे जरुरीचे आहे. माती तपासणी अवहाला नुसार बर्याच बाबी समजतात. अगदी पहिले काही घटक पाहुया म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल.
    1) सामू - पी एच
    आदर्श सामू 6.5 ते 7.5 असा समजला जातो. सामुचे प्रमाण आदर्श असेल तर जमिनीत दिलेले अन्न घटक , आणि जीवाणु मार्फत उपलब्ध स्वरूपात तयार झालेले अन्न घटक पिकास शोषण करता येणे सुलभ होते. जस जसा सामू कमी किंवा जास्त होत जातो तस तसे अन्न घटक पिकास शोषून घेण्यास अड्चण यायला लागते. हे नैसर्गिक आहे. अन्न घट्काचे शोषण योग्य होण्यासाठी सामू योग्य असावा लागतो. आपल्या जमिनीचा सामू वाढत निघाला आहे, म्हणजे जमीनी 'वीम्ल' किंवा 'अल्कली' होत आहेत. त्या योग्य करण्यासाठी जमिनीत सेंद्रिय खताचा मुबलक वापर केला पाहिजे. 'वीम्ल' वाढलेल्या जमिनीत 'आम्ल' दिले तर 'विम्लता' कमी व्हायला लागते आणि दिलेले अन्न घटक पिकास उपलब्ध व्हायला लागतात. अन्न भरपूर शोषता आले तरच पिक भरपूर येते.तर सामू योग्य राखणे अत्यंत महत्वाचे आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीत विविध 'असिड्ची' 'आम्ल्तेची' निर्मिती होत रहाते, जसे ह्युमिक असिड वगैरे, 'वीम्ल' जमिनीत 'आम्ल' वाढवले की आपोआपच 'विम्लता' कमी व्हायला लागते आणि सामू योग्य रहातो. अन्न घट्काचे शोषण वाढते आणि उत्पादन वाढते. सुनिल अग्रो एजन्सीज् भोकरदन.
    अपेक्सित ऊस उत्पादनाचे सूत्र वापरणे
    अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र आपण पाहिले. हे उपयोगात आणणे फार सोपे आहे. यासाठी पहिल्यांदा माती तपासणे जरुरीचे आहे. माती तपासणी अवहाला नुसार बर्याच बाबी समजतात. अगदी पहिले काही घटक पाहुया म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल.
    1) सामू pH -
    2) विधुत क्षारता EC - Electric Coductivity
    ही नेहमी 1 च्या आत असावयास पाहिजे. EC हा वाढला तर अन्न घटकाच्या उपलब्धतेवर वाईट परिणाम होतो. रासायनिक व जैविक बाबींवर वाईट परिणाम होतो. याचा सामू वर देखिल परिणाम होत असतो. अशा अनेक बाबी आहेत की ज्याचा EC शी सम्बन्ध आहे. आपण एवढेच लक्षात घेतले पाहिजे की EC हा 1च्या आत असला पाहिजे. आणि त्यासाठी चांगला उपाय म्हणजे सेंद्रिय खताचा योग्य आणि मुबलक पुरवठा करणे हा होय.
    3) सेंद्रिय कर्ब- कोणतेही पिक उत्तम घ्यायचे असेल तर त्याची पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे " जमिनीची सुपिकता" होय.
    जमीन सुपिक करणे म्हणजे योग्य मशागत करणे, योग्य प्रमाणात सेंद्रिय खताचा पुरवठा करणे. उन्हाळ्यात जमीन तापवणे अशा बाबी होत.
    सेंद्रिय खतात उत्त्कृष्ट म्हणजे शेणखत होय. पण नमकं त्याचीच कमतरता आपल्या सर्वांना आहे.
    शेणखताला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे..... फक्त शेणखतच होय. शेणखता शिवाय उत्तम शेती पिकवणे तसे अवघडच. तरी पण शेणखत उपलब्द नसल्यास त्याला पर्याय म्हणून इतर खते वापरता येतात, उदा एकरी कम्पोस्ट खत 8 ते 10 टन, गान्डुळ खत 3 ते 4 टन, पोल्ट्री खत 1ते 1.5 टन, अखाद्य पेण्डि मिश्रण 500किलो, लेंडी खत किंवा हिरावाळिचे खत . या पैकी कोणते ना कोणते तरी योग्य प्रमाणात पुरवल्यास जमीन सुपिक होण्यास मदत होते.
    सेंद्रिय खत दिल्यामुळे अनेक फायदे होतात, जसे, उपयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मातीच्या कणांची रचना सुधारते. दोन कणाच्या पोकळित ह्यूमसचे प्रमाण वाढते, सामू योग्य राखणेस मदत होते, असे अनेक महत्वाचे फायदे होतात आणि महत्वाचे म्हणजे सेंद्रीय कर्बाची पातळी वाढते. सेंद्रिय कर्ब हा जिवानुचे खाध्य समजला जातो. सेंद्रिय कर्ब जेवढा जास्त तेवढे जीवाणुची संख्या आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे उपलब्ध अन्नाची पातळी वाढते.
    ऊसासाठी पुरवलेले अन्न पिकास उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य हे जिवाणु करीत असतात. त्यासाठी जिवाणुची संख्या आणि कार्यक्षमता योग्य असणे गरजेचे असते. सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात असल्यास हे शक्य होते.
    1 टक्का सेंद्रिय कर्ब असणे म्हणजे म्हणजे जमीन खुप सुपिक होय. आपल्या कड़े सरासरी 0.5 टक्के एवढा सेंद्रिय कर्ब असतो. सेंद्रिय खते मुबलक दिल्यास हा 0.7 ते 0.8 एवढा वाढू शकतो. आपल्या कडील तपमानात दोन तीन महिन्यात हा वाढलेला कर्ब पुन्हा कमी कमी होतो. त्यामुळेच ऊसा सारख्या जास्त दिवसाच्या पिकास दोन वेळा सेंद्रिय खते द्यावीत. एकदा ऊस लागणी दरम्यान व दुस-यांदा भरणी / पक्की / मोठी बांधणी करताना.
    मी एकरी 8 ते 10 टन कारखान्याचे लूज कम्पोस्ट देतो. आणि लागणी पूर्वी हिरवळिचे खत करतो. एकदा हिरवळिचे खत म्हणजे एकरी 50 बैल गाड्या शेण ख़त दिल्यासारखे आहे असे म्हंटले जाते.

    Top

    दुधाळ गाईची निवड

    By - प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)

    दुधाळ गाईची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात
    लक्षणे
    १) दुधाळ गाईची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दुधुत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी.
    २) गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दुध २-३ वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवन मोठया आकाराची कास याबाबतीत गृहीत धरू नये.
    ३) गाईला पान्हावयास किती वेळ लागतो? टी आंबोणशिवाय धार देते का? किंवा नाही? तिला ठराविक गवळ्याची सवय आहे का? या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी.
    ४) तापट स्वभावाच्या गाई, उत्तेजित झाल्या, कि पान्हा चोरतात म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी.
    ५) धारेच्या वेळी लाथा मारणारी, चीर्गुत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळाव.
    ६) धरेला (पिळण्यासाठी) हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळं दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दुध काढून पाहावं.
    ७) गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी.
    ८) जातिवंत दुधाळ गाई तरतरीत आणि निरोगी दिसतात.
    ९) त्यांचे डोळे पाणीदार असतात.
    १०) सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते.
    ११) शरीराचा आकार वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो.
    १२) गाईकड पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असाव.
    १३) छाती भरदार असावी.
    १४) वरून पाहिलं असता कमरेची हाडं दूरवर असावीत.
    १५) बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं.
    १६) गाय लठ्ठ नसावी.
    १७) लांब आणि सडपातळ असावी.
    १८) पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.
    १९) पाठीला बक असणाऱ्या गाई शक्यतो टाळाव्यात.
    २०) गाईंच्या खुरांचा रंग काला असावा.
    २१) वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा याबाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं.
    २२) गाय विकत घेताना टी चालवून- फिरवून पहावी.
    २३) कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेले दिसतात. दुध काढल्यानंतर कासेच आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी.
    २४) कासेवर अनेक फाटे असणारं शिरांच जाळ असावं. शिरा जड असाव्यात.
    २५) चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत.
    २६) ज्या वेळी गाईची दुध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेतान तिची निवड करावी.

    Top

    गांडूळ शेती

    By - प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)

    गांडूळ खत वापरून तसेच गांडुळांची संख्या वाढवून शेती करण्यास गांडूळ शेती म्हणतात.
    गांडूळाच्या पृथ्वीतलावर सुमारे ३००० जाती आढळतात.
    गांडूळांना वानवे, वाले, केचळे, शिदोढ, आणि काडू अशा अनेक नावानी ओळखले जाते.
    गांडूळ शेती करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

    हवामान: गांडूळ शेती वर्षभरात आपण कधीही करू शकतो. गांडूळाची पैदास कोणत्याही हवामानात होत असते. फक्त गादी वाफ्यातील तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस असावे.

    जागेची निवड: गांडूळ शेतीसाठी जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी तसेच खड्डयाच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत कारण झाडाची मुळे गांडूळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते त्यासाठी छप्पर किंवा शेड तयार करावे

    छप्पर किंवा शेड बांधणीची पद्धत: ऊन व पावसापासून गांडूळाचा बचाव करण्याकरता ८ फुट उंच, १० फुट रुंद, व ३० ते ४० फुट लांब छप्पर असावे. छप्परात शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी.

    गांडूळ पालनाची पद्धत: छप्परामध्ये दोन फुट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्याच्या दोन्ही बाजूने तीन फुट रुंदीचे दोन गादी वाफे करावे. त्या दोन वाफ्यावर ऊसाचे पाचट, केळीचा पाला, किंवा कड्याकुड्याचे तुकडे यांचा ६ इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडूळांना जाड कचऱ्यात आश्रय मिळतो. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या खताचा द्यावा. ते उष्णता निरोधनाचे काम करते. बीज रूप म्हणून या थरावर ३ × ४० फुटासाठी १० हजार गांडुळे सारखी पसरावी. व त्यावर दीड इंच कचऱ्याच थर द्यावा आणि ओल्या पोत्याने किंवा गोणपाटाने झाकून ठेवावे.

    गांडूळाचे खाद्य: खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष असावेत. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, प्राण्यांची विष्टा, लेंडीखत, कंपोस्ट खत, शेणखत इत्यादी पदार्थ हे त्यांचे खाद्य होय. ते त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असते.

    Top

    काकडीची लागवड

    By - प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)

    वेलवर्गीय फळांमध्ये काकडीला अनन्यसाधारण महत्त्व असून, वाढणार्‍या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी एस.टी. स्टँडवरती पुष्कळ लोक (प्रवासी) काकडी खाताना दिसतात. उच्च व मध्यमवर्गीय लोकांमध्ये काकडीचा उपयोग प्रकृतीस्वास्थ्यासाठी, सौंदर्यप्रसाधनासाठी म्हणून प्रचलित आहे हे आपण टी. व्ही. वरील जाहिरातीद्वारे पाहतोच आहे. कृत्रिम, रासायनिक औषधांपासून तयार केलेल्या कॉस्मेटिक्समुळे त्वचेवरील नंतर होणार्‍या वाईट परिणामांची भीती असणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये उन्हाळा कधी असतो असे म्हणण्यापेक्षा उन्हाळा कधी नसतो असे म्हणण्याची वेळ आली आहे. कच्छच्या वाळवंटातील 'केट्टा' सारखी अनेक बेटे वाढत्या तापमानामुळे तळपत असताना दिसतात. भारतामध्ये खानदेश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक भागांमध्ये अशा प्रकारचा सनस्ट्रोक टाळण्यासाठी, तसेच अॅसिडीटी, कॉन्सिटिपेशन कमी करण्यासाठी 'काकडी' अत्यंत गुणकारी आहे.
    असे बहुगुणी परंतु शेतकर्‍याचे कमी लक्ष असलेले बर्‍यापैकी पैसा देणारे वेलवर्गीय पीक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    आहारातील महत्त्व:
    काकडी पिकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
    पाणी - ९६.३० %, कर्बोहायड्रेट्स - २.५०%, प्रोटीन्स - ०.४०%, फॅट्स - ०.१०%, तंतुमय पदार्थ - ०. ४० %, खनिजे - ०.३०%, कॅल्शिअम - ०.०१%, फॉस्फरस - ०.०३%, लोह - ०.००२%, जीवनसत्त्व 'क' - ०.००७%, उष्मांक (कॅलरी) -१३.

    काकडीचे पीक महाराष्ट्रात बहुतेक सर्वच जिल्ह्यांत आणि विशेषत: मोठ्या शहरांच्या जवळ वर्षभर मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

    जमीन आणि हवामान : काकडी या पिकाला हलकी ते मध्यम आणि उत्तम निचर्‍याची जमीन लागते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास पीक लवकर तयार होते. पावसाळ्यात जमिनीत पाणी साचू नये आणि उन्हाळ्यात जमिन तडकू नये, अशी जमीन असावी. काकडीचे भरपूर उत्पादन मिळण्यासाठी जमीन कसदार असावी.

    काकडीला उष्ण हवामान चांगले मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास काकडीच्या पिकाची वाढ चांगली होते नाही. रोग व किडीचे प्रमाण वाढते. वातावरणाचे तापमान ११ डी. सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बियांची उगवण चांगली होत नाही. तापमान १८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास बियांची उगवण चांगली होते. साधारणपणे ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश या पिकास चांगला मानवतो.

    लागवडीचा हंगाम: काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून - जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.

    जाती:
    १) पुना खिरा: महाराष्ट्रात काकडीच्या या जातीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. या जातीची फळे लहान असतात आणि रंग हिरवट पांढरा असतो. फळे काढण्यास उशीर झाल्यास फळांचा रंग पिवळसर तपकिरी होतो. लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळे काढावयास येतात.
    २) हिमांगी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पूना खिरा जातीपेक्षा जास्त उत्पादन देणारी काकडीची जात आहे. या जातीची खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे पांढर्‍या रंगाची आणि १२ ते १५ सेंमी लांबीची असतात. काढणीनंतर फळे पिवळी किंवा तपकिरी रंगाची होते नाहीत, त्यामुळे बाजारात या फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
    ३) शीतल: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली शीतल ही काकडीची एक चांगली जात असून अधिक पावसाच्या कोकण भागासाठी तिची शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे मध्यम लांबीची असून फिकट हिरव्या रंगाची असतात. ही जात खरीप हंगामात जून -जुलै महिन्यात लावतात. हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते.
    ४) फुले शुभांगी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण पॉईनसेट आणि कल्याणपूर अगेती यांच्यातून संकर व निवड पद्धीने विकसित केला आहे. अधिक उत्पादन, फळांचा रंग हिरवा, फळे चवदार व साठवणीत हिरवा रंग अधिक काळ चांगला राहतो. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांसाठी लागवडीस योग्य. उत्पन्न हिमांगीपेक्षा २३% जास्त येते. तर पूना खिरापेक्षा ५३% अधिक येते. सरासरी हेक्टरी उत्पन्न १६ -१८ टन असून केवडा रोगास प्रतिकारक आहे. संकरित जाती:
    जिप्सी: हा वाण नामदेव उमाजी अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनीचा वाण असून फळे पांढरट हिरव्या रंगाची असून साल चमकदार असते. फळांची लांबी १६ ते १८ सेंमी असून फळे सरळ एकसारख्या आकाराची असतात. अतिशय उत्पादनक्षम जात असून २०० ते २५० गरम वजनाची फळे असतात.
    याशिवाय मालिनी, शिवनेरी या वाणाची काकडीदेखील अधिक उत्पादनक्षम असून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली असल्याने या वाणांची देखील लागवड बहुतांश शेतकरी करीत असतात.

    बीजप्रक्रिया: जर्मिनेटर २० मिली. + २५० मिली. पाणी या द्रावणात २५ ते १०० ग्रॅम बी ३ ते ४ तास भिजवून सावलीत सुकवून लागवड करावी. त्यामुळे उगवण कमी दिवसात एकसारखी होते. थंडीच्या दिवसात बीजप्रक्रियेस कोमट पाणी वापरणे फायदेशीर ठरते.

    लागवड: काकडीवर्गीय पिकांची लागवड पाट पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते. काकडीच्या लागवडीसाठी रुंद सरी - वरंबा पद्धत चांगली मानली जाते. काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे. पाटाच्या एका बाजूने वरंब्याच्या टोकापासून एकतृतीयांश अंतरावर खुरप्याच्या सहाय्याने लहानसा खळगा करून त्यामध्ये १ ते २ बिया एका ठिकाणी टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात. पाटात पाणी सोडून पाट - सर्‍या भिजवाव्यात. पाटातील पाण्याची पातळी टोकलेल्या बियांच्या जागेच्या खाली असावी.

    थंडीतली लागवड: थंडीमध्ये बी लवकर उगवत नाही. त्यासाठी पाव ते अर्धा लिटर कोमट पाण्यामध्ये २५ - ३० मिली जर्मिनेटर मिसळून, या मिश्रणामध्ये बी चार तास भिजवून सावलीत सुकवावे व हे बी एका आड एक असे (झिगझॅग पद्धतीने) लावावे.

    बी साधारण ६ ते ८ दिवसानंतर उगवते. थंडीमध्ये सरी काढताना उदा. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये सूर्य दक्षिणायनात असल्याकारणाने जर पूर्वे - पश्चिम सरी काढली तर उत्तरेकडे टोकलेले बी सहसा उगवणीच्या प्रमाणात घट देते, कारण सुर्यप्रकाश कमी मिळतो. तेव्हा थंडीमध्ये काकडीची खिर्‍याची लागवड करायची असेल तर सरी दक्षिणोत्तर काढून बी पूर्वपश्चिम लावले, म्हणजे सर्व बी उगवून येईल.

    खते आणि पाणी व्यवस्थापन: काकडी या पिकासाठी एकरी ६ ते ८ टन शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १५० किलो द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धीत्ने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. काकडी हे पीक उन्हाळी हंगामात घेतल्यास पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीपूर्वी सर्‍या ओलावून घ्याव्यात आणि नंतर लागवड करावी. लागवड केल्याबरोबर पाणी द्यावे. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीचा मगदूर, पिकाची वाढ व हवामान यांचा विचार करून पाणी द्यावे. पाणी सरीतच राहील (वेल पसरणार्‍या मधल्या पट्ट्यात जाणारा नाही) याची काळजी घ्यावी. पाणी कसे, किती व केव्हा द्यावे?
    थंडीमध्ये सकाळी १० ते दुपारी २ ह्यावेळेस पाणी द्यावे. तसेच उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ ते १० च्या आत पाणी द्यावे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश ह्या भागांमध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. थंडीमध्ये आठ दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. पाणी देताना 'भीज पाणी' (संपूर्ण पाणी देणे) न देत 'टेक पाणी' (हलके पाणी देणे) द्यावे.

    किडी:
    १) लाल भुंगे: लाल भुंगे, पीक लहान असताना पाने कुरतडून खातात. बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते.
    २) फळमाशी: फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते. या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.

    रोग:
    १) भुरी: भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात, त्यमुळे पिकाची वाढ खुंटते, फळे वाढत नाहीत. उत्पादन घटते. काकडी हे पीक भुरी रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडते. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे सुरूवातीपासून फवारण्या कराव्यात.
    २) केवडा: केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर काकडीच्या पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोड रोगाला बळी पडतात.
    ३) करपा: करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग बळावतो.
    'करपा' रोग पडण्याची कारणे : काकडी हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींची वाढ जमिनीलागत पसरत चालते तसेच पाने केसाळ लवयुक्त असल्यामुळे थंडीतील दव, धुके व पाणी दिल्यानंतर निर्माण होणारे बाष्प हे झपाट्याने ह्या भागांवर आकर्षिले जाऊन ' करपा' वाढण्याची शक्यता निर्माण होते . त्यामुळे पुढीलप्रमाणे औषधे वेळच्यावेळी फवारणे गरजेचे असते.

    फवारणी:
    १) पहिली फवारणी: ( उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.
    २) दुसरी फवारणी: ( ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.
    ३) तिसरी फवारणी: ( ४५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.
    ४) चौथी फवारणी: (तोड चालू ठेवेपर्यंत वरील फवारणीनंतर दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

    काढणी: काकडीची तोडणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे असते. काकडीचा उपयोग कोशिंबिरीसाठी जास्त प्रमाणात होतो, म्हणून काकडी कोवळी, लुसलुशीत अवस्थेतच तोडावी. बी टोकल्यापासून साधारणत: ३० - ४० दिवसांत फळे येतात. दर २ -४ दिवासांनी तोडणी करावी. तथापि नंतर काकडी वाकडी, पिवळी पडते असे प्रकार घडतात. त्यामुळे तिला 'बदला काकडी' असे संबोधण्यात येते व अशा काकडीचा दर २ ते ३ रू. किलो असा मिळतो. तर उत्कृष्ट दर्जाच्या काकडीचा दर थंडीमध्ये ८ ते २० रुपये किलोपर्यंत मोठ्या मार्केटमध्ये होलसेल मिळू शकतो.

    Top

    Top

    बी. टी. कापूस लागवड विशेष बाबी

    By - प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)

    १) ज्या जमिनीची खोली २ फूट किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या जमिनीत कापसाची लागवड करावी.
    २) जमिनीचा सामू ८.५ पेक्षा जास्त व सेंद्रिय कर्ब ०.२ टक्के पेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत बी. टी. कापसाची लागवड टाळावी.
    ३) चिबड, पाणथळ, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन लागवडीसाठी निवडू नये.
    ४) पीक नियोजनामध्ये गतवर्षी किंवा पुढील वर्षी हरभरा, भेंडी, अंबाडी व टोमॅटोची लागवड केली किंवा करणार असल्यास अशा जमिनीतही कापूस लागवड टाळावी. गेल्यावर्षी बी. टी. कापसाचे पीक घेतलेल्या ठिकाणी चालू हंगामात बी. टी. कापसाची लागवड टाळावी.
    ५) कापूस लागवडीपूर्वी सेंद्रिय खत किंवा चांगल्या कुजलेल्या शेणखताची उपलब्धता समलक्षात घ्यावी. सेंद्रिय खताची उपलब्धता नसल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते. पिकासाठी माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. त्यासाठी आवश्‍यक त्या अन्नद्रव्याची उपलब्धता करून घ्यावी.
    ६) फुले लागणे व बोंड भरते वेळेस ओल्याव्याची आवश्‍यकता असते. या कालावधीत पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही संवेदनशील अवस्थांसाठी संरक्षित पाण्याची सोय अथवा तजवीज करावी.
    ७) बी. टी. कापसावर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी सापळा पिकांची लागवडही करावी. त्याचप्रमाणे बी. टी. कपाशीमध्ये येणाऱ्या रोगकिडींचा अंदाज घेऊन एकात्मिक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना राबवाव्यात.
    ८) गतवर्षी २,४ डी या तणनाशकाची फवारणी केलेली असल्यास त्या ठिकाणी बी. टी. कापसाची लागवड करू नये.
    ९) आपल्या शेताच्या वरील बाजूने पाणी येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात २,४ डी या तणनाशकाची फवारणी संबंधित शेतकरी करणार असेल, तरी त्या ठिकाणी कापसाची लागवड करू नये.
    १०) कापसाच्या शेताशेजारील शेतकरी पिकामध्ये २,४ डी या तणनाशकाची फवारणी करणार असेल तर त्या ठिकाणीसुद्धा वाऱ्याच्या प्रवाहामुळे कापसावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
    ११) कापसाचे बियाणे व २,४-डी तणनाशक अधिक कालावधीसाठी एकत्र ठेवू नये. त्याचाही कापूस पिकावर नकारात्मक परिणाम होतो.

    Top